Archive for नोव्हेंबर, 2010

मी डेटिंग केले नाही……

Posted in मराठी on नोव्हेंबर 3, 2010 by कुणाल चांदेगावकर

*खालील कविता ही संदीप खरेच्या ‘*मी मोर्चा नेला नाही’ चे अतिशय भारी विडंबन
आहे… *

मी डेटिंग केले नाही……

मी डेटिंग केले नाही, मी सेटिंग केले नाही.
मी निरोप सुद्धा साधा कधी पाठवलेला नाही.

भवताली चॅटिंग चाले, ते विस्फारुन बघताना,
कुणी दोस्ती वाढवताना, कुणी गर्लफ्रेंड मिळवताना.
मी लॉग इन होऊन बसलो, मेसेंजरवरती जेव्हा.
मज हाय करायला देखिल कुणीही पिंग केले नाही.
मी डेटिंग केले नाही..

बुजलेला यांत्रिक चेहरा, सुटलेली घाबरगुंडी.
सुंदर पोरी बघताना भर उन्हात वाजे थंडी
त्यांच्या बापाला भ्यालो, अन भावालाही भ्यालो.
मी स्वप्नी सुद्धा माझ्या कधी “लफडा” केला नाही.
मी डेटिंग केले नाही

अव्यक्त फार मी आहे, मूळ मुद्दा जिथल्या तेथे.
कॉलेजात अभ्यास केला, कंपनीत करतो कामे.
पण बोटातुन कुठलीही एंगेजमेंटची रिंग नाही.
कुणी प्रपोज केले नाही ,कधी फ़्लर्टिंग जमले नाही.

मज जन्म नटाचा मिळता मी “हंगल” झालो असतो.
मी असतो जर का व्हिलन, तर “जीवन” झालो असतो.
मज पाहुन तरुणी कोणी हसली वा चिडली नाही.
मी “शाहिद” झालो नाही, “शक्ती” ही झालो नाही.

— अभिजीत दाते
मूळ गीत – मी मोर्चा नेला नाही
कवी – संदीप खरे
*मी मोर्चा नेला नाही*

मी मोर्चा नेला नाही

मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही
मी निषेध सुद्धा साधा, कधी नोंदवलेला नाही

भवताली संगर चाले, तो विस्फ़ारुन बघताना
कुणी पोटातून चिडताना, कुणी रक्ताळून लढताना
मी दगड होउनी थिजलो, रस्त्याच्या बाजूस जेव्हा
तो मारायाला देखिल, मज कुणी उचलले नाही

नेमस्त झाड मी आहे, मूळ फ़ांद्या जिथल्या तेथे
पावसात हिरवा झालो, थंडीत गाळली पाने
पण पोटातून कुठलीही, खजिन्याची ढोली नाही
कुणी शस्त्र लपवले नाही, कधी गरूड बैसला नाही

धुतलेला सात्विक सदरा, तुटलेली एकच गुंडी
टकलावर अजून रुळते, अदृश्य लांबशी शेंडी
मी पंतोजींना भ्यालो, मी देवालाही भ्यालो
मी मनात सुद्धा माझ्या, कधी दंगा केला नाही

मज जन्म फ़ळाचा मिळता, मी “केळे” झालो असतो
मी असतो जर का भाजी, तर “भेंडी” झालो असतो
मज चिरता चिरता कोणी, रडले वा हसले नाही
मी “कांदा” झालो नाही, “आंबा”ही झालो नाही